राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला. 

Updated: Dec 11, 2020, 12:38 PM IST
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस  title=

मुंबई / पालघर / वसई / नवी मुंबई/ पुणे : राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला. आज सकाळपासून मुंबईसह (Mumbai) नवी मुंबई, (Navi Mumbai)  वसई,(Vasai) पालघर, (Palghar) रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता 

पुण्यातही (Pune) सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झालेले नाही. हवेतील गारवा मात्र वाढला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, तसे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वसई विरार । अवकाळी पावसाची हजेरी

वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासून वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाल्या. या पावसाने वातावरणात गारवा  पसरला असला तरी अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे कोणतीही कल्पना नसताना कामाधंद्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची सकाळी पावसामुळे  तारांबळ उडाली.  

नवी मुंबई, पालघर । अधूनमधून रिमझीम पाऊस

तर अनेकांना कित्येक दिवसांपासून घरात  ठेवून दिलेल्या छत्र्या पुन्हा बाहेर काढाव्या लागल्या. नवी मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. शहराच्या अनेक भागात अधूनमधून रिमझीम पाऊस पडत आहे. पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला. कामाला जाणारे चाकरमानी आणि मॉर्निंग गेलेल्यांची पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली. पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड या भागात रिमझिम पाऊस झाला.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने या भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. दरम्यान या अवेळी पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाला लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.

रायगड । सर्वच भागात चांगला पाऊस

रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस आला. अलिबाग ते पोलादपूर या सर्वच तालुक्यात रिमझीम पावसाची हजेरी आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडत आहे. पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.