रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जगबुडी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर

कोकणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. काल दुपारपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. 

Updated: Aug 4, 2020, 12:57 PM IST
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जगबुडी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर  title=

मुंबई : कोकणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. काल दुपारपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. चिपळूण, राजापूर आणि खेड येथील नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे. खेडमधील गजबुडी नदीचे पाणी भरणा नाका पुलापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हा पूल पाण्याखाली जाण्याची भिती वर्तविण्याच येत आहे. दरम्यान, रत्नागिरी जवळील चांदेराई येथील बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदीला पूर आला आहे.

जगबुडी नदीला पूर

खेड जगबुडी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली असून  भरणे नाका पूला पर्यंत पाण्याची पातळी आली आहे. आज सकाळी सहा वाजता अलर्ट जारी करण्यात आला  होता. सात वाजता नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड शहरात पाणी भरण्याची शक्यता असल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे. सकाळी पावसाचा जोर कायम दिसून येत आहे.

 चांदेराई बाजारपेठेत पाणी 

रत्नागिरी शहर आणि तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. चांदेराई बाजारपेठ काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई भागात पाणी घुसले आहे. चांदेराई बाजारपेठेत देखील पाणी भरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ९२.७१ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता  इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे.  संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून येते १४२.३० मिलिमीटर  पाऊस पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात  मंडणगडमध्ये १०२.३० मिमी, दापोली ७०.८०, खेड ९८.६० मिमी, गुहागर ११०.६०, चिपळूण ८३.६० मिमी, संगमेश्वर १४२.३० मिमी, रत्नागिरी ३३.३० मिमी, राजापूर ६०.३० मिमी, लांजा६५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रायगडमध्ये पुराचा धोका

रायगडमधील महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला असून नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
        
सर्वसाधारणपणे सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मीटर असून सद्य:स्थितीत ही धोका पातळी सावित्री नदीने ओलांडली असून सकाळी नऊ नऊच्या सुमारास ही पातळी  ७.३० मीटर इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाने  दिली आहे.

सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे.स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,  अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.