रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान

सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

Updated: Jun 28, 2017, 06:59 PM IST
रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान title=

रत्नागिरी : सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. समुद्रातून उसळणाऱ्या अजस्त्र लाटांच्या तडाख्याने जमिनिची मोठी धूप झालेली आहे. 

या भरतीच्या लाटांच्या तडाख्याने कोकणच्या अनेक किनाऱ्यावरील बागायती समुद्राने आपल्या पोटात घेतल्यात. लाटांच्या तडाख्यानं गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर किनाऱ्यावर असलेल्या कोळी बांधवांच्या घरांचे नुकसान झालंय तर स्मशान शेडसाठी असलेली भिंत समुद्राने गिळंकृत केलीय.

तसेच बागायतीचं प्रचंड नुकसान यावर्षी देखील झालंय. समुद्र किनारपट्टीत खूप आत पाणी शिरल्याने आता अनेक बागा धोकादायक स्थितीत आल्यात. तर शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. 

वेळणेश्वरबरोबरच आता रत्नागिरीच्या मि-या गावातील बंधारादेखील वाहून गेलाय. यामुळे इथल्या काही घरांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाने दिलाय. आणखी दोन दिवस अशीच समुद्राला भरती येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.