श्रीकांत राऊत, यवतमाळ : घाटंजी तालुक्यात आज अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दत्तापूर गावात तर वादळामुळे एकच धावपळ उडाली. वादळात जिल्हा परिषद शाळेच्या ईमारतीसह अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. गावातील २५ घरांवरील कवेलू, टिनपत्रे उडून गेल्याने घरात पाणी घुसून अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. या वादळी पावसाचा फटका जिल्हा परिषदेच्या शाळेला देखील बसला, शाळा ईमारतीचे टिनाचे छत वादळात उध्वस्त झाले. त्यामुळे काही दिवसांनी सुरु होणारे शाळेचे वर्ग भरणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल घरी ठेवला होता. मात्र वादळी पावसात घरांची पडझड झाल्याने हा शेतमाल खराब झाला. मान्सूनपूर्व अचानक सुरु झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाला काही अंशी दिलासा मिळाला. शिवाय उकाड्याने हैराण नागरिकांनाही ढगाळी वातावरण आणि पावसामुळे काहीसा गारवा अनुभवता आला.