Anil Navgane Car Attacked: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरदरम्यान नवगणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये नवगणे यांच्या कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. अनिल नवगणे यांनी हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी केल्याचा आरोप केला आहे.
अनिल नवगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितलं. "संध्याकाळी सात वाजता सुष्मा अंधारेंची जाहीर प्रचारसभा महाडमध्ये होती. सभा संपली आणि एका लग्नाला उपस्थिती लावून मी हायवेने येत होतो. अचानकपणे वीर जवळ आल्यानंतर समोरुन बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या बाजूने काचेवर करण्यात झाला. दुसऱ्या बाजूने 25-30 जणांनी हल्ला केला. यामध्ये आमदार भरत गोगवले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे पुत्र स्वत: मला जिवे मारण्यासाठी तिथे आले होते. चालकाने परिस्थितीचं भान राखून कार वेगाने जमावामधून बाहेर काढली. मात्र 25-30 लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. माझी गाडी पूर्णपणे फोडली. माझे चालक आणि सोनावणे नावाचे सहकारी माझ्याबरोबर होते. मी माणगाव येथे आल्यानंतर तेथील पोलीस अधिक्षक स्वत: मला भेटायला आले," असं नवगणे यांनी सांगितलं.
"अशाप्रकारे काळोखातून आमदार पुत्र हल्ले करत असतील तर मला वाटतं त्यांनी बांगड्या भराव्यात. कारण असे हल्ले केल्याने आम्ही संघटनेचं काम करायचं थांबणार नाही. दक्षिण रायगडचा जिल्हाप्रमुख मी माझे विचार प्रकटपणे व्यक्त करतो. आज मी महाडमध्ये भाषण केलं. त्यापूर्वीही मी भाषण केलं. अशा भाषणांमधील वक्तव्यांचा राग मनात धरुन तुम्ही हल्ले करत असाल तर आमदार आणि त्यांच्या पुत्राने बांगड्या भरुनच घरात बसावं. हल्ले करतं कोण? डोक्यामध्ये कायम याला मारु, त्याला मारु असे विचार असतात तेच करतात. काही म्हणतात आमदाराने पूर्वी हत्या केल्या होत्या. त्यांना सत्तेत असल्याने थोडा माज चढला आहे. असे 100 हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही संघटनेसाठी कायम काम करणार. वस्तूस्थिती कायम मांडत राहणार," असंगी नवगणे यांनी म्हटलं आहे.
"मी कधीच घाबरणार नाही. मी बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरेंचे विचार आम्ही बाहेर घेऊन फिरतोय. त्यांना पराभव समोर दिसत आहे. त्या नैराश्येमधूनच माझ्यावर हल्ले करत आहेत. चालकाने गाडी बाहेर काढल्याने बचावलो. त्यांचा मला जिवे मारण्याचा विचार होता. मात्र मी घाबरणार नाही. मी तुमच्या घरासमोर येऊन सभा घेईन. तुम्ही गाड्या फोडा नाहीतर जीवे मारा आम्ही बोलणं थांबवणार नाही," अशा शब्दांमध्ये नवगणे यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.
"आम्ही विकास गोगावले आणि त्यांच्या 25-30 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मी स्वत: काचेतून विकास गोगावलेंना पाहिलं आहे. ते फॉर्च्युनर गाडी घेऊन आले होते," असं नवगणे यांनी सांगितलं. नवगणे यांच्या तक्रारीनुसार 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.