प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख आजही धुळखात पडलाय. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त या शिलालेखाचा प्रश्न समोर आणून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होतोय.
रायगड जिल्ह्यातल्या आक्षी गावात शिलालेख असून श्रवणबेळगोळ इथल्या शिलालेखाहून प्राचीन असल्याचं इतिहास संशोधकांनी सिद्ध केलंय. शके 934 म्हणजे इसवी सन 1 हजार 12 मध्ये याची निर्मिती करण्यात आली. मात्र मराठी भाषेतला हा पहिला शिलालेख आजही ऊन वारा पावसाचा मारा खात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
कालौघात या शिलालेखावरील मराठीतील अक्षरे पुसट झालीयत. मात्र त्याकडे कुणाचंच लक्ष नसल्याचे मराठी भाषा अभ्यासक डॉ. प्रगती पाटील सांगतात.
पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केशीदेवरायांच्या महाप्रधान भडर्जू सेणुई यांनी हा शिलालेख तयार करवून घेतला. त्यावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या असून देवीसाठी 9 कवली धान्य दान दिल्याचा उल्लेख यावर करण्यात आलाय.
शिलालेखावर चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. अनेकांना या शिलालेखाचं महत्त्व माहीत नसल्याने त्याची पूजा केली जाते अशी माहिती शिलालेख अभ्यासक प्रमोद पाटील यांनी दिली.
शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनानं नुकताच घेतला. परंतु या शिलालेखाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ना पुरातत्व विभागानं काही प्रयत्न केले ना स्वतःला मराठीचे कैवारी म्हणवणाऱ्यांनी मराठी भाषेचा हा अनमोल ठेवा जपायलाच हवा अशी मागणी होत आहे.