पुणे : पुलंच्या घरात चोरीचा प्रयत्न केलेल्या चोराला पोलिसांनी अटक केलीय. जितसिंग टाक असं आरोपीचं नाव आहे. त्यानं आणि त्याच्या ३ साथीदारांनी १९ डिसेंबरच्या पहाटे पुलंच्या भांडारकर रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र घरात पुस्तकं तसेच पुलंच्या साहित्य संपदेशिवाय काहीच नव्हतं. त्यामुळे चोरांनी फक्त घरातील कपाटं विस्कटली होती. या घटनेत चोरांच्या हाती त्यांच्या कामाचं असं काहीच लागलं नाही. तेव्हा ते चोरी न करता निघून गेले होते. असं असलं तरी पुलंच्या घरी चोरी ही गंभीर बाब होती. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागणं महत्वाचं होतं. या पार्श्वभूमिवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपी जीतसिंग हा क्रिकेट मॅच खेळण्यासाठी निगडीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी देखील क्रिकेट मॅच खेळण्याचा बनाव करत आरोपीला जेरबंद केलं. आरोपीनं आणखी काही ठिकाणी चोरी केली होती. त्याठिकाणी त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. आरापी जितसिंग हा हडपसरचा राहणार असून त्याचं १२ पर्यंत शिक्षण झालयं. मात्र दूर्दैवानं त्याला पुलं आणि त्यांच्या साहित्यसंपदेविषयी काहीच माहित नाही. या निमित्तानं त्याला एवढं कळलं तरी पुरे आहे.