FTIIमध्ये सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

Updated: Aug 5, 2022, 04:26 PM IST
FTIIमध्ये सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील (Pune) फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजनमध्ये (FTII) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या एफटीआयमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. 

सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रूम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खिडकीतून पाहिले असता विद्यार्थ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलीस अग्निशमन दला पाचारण केले आणि मृतदेह ताब्यात घेत तो रुग्णालयात पाठवला.

आत्महत्या केलेला विद्यार्थी एफटीआयआयमधील मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. तो मूळचा गोवा येथील आहे. एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. पोलिसांनी सांगितले की, मृत विद्यार्थी एफटीआयआयच्या सिनेमॅटोग्राफी कोर्सचा 2017 च्या बॅचचा विद्यार्थी होता.