दहीहंडीच्या वर्गणीसाठी तरुणांची दादागिरी, दुकानदाराला मारहाण करत केली तोडफोड

दहीहंडीची कमी वर्गणी दिल्याने आरोपींनी दुकानदाराला मारहाण केली

Updated: Aug 11, 2022, 11:10 PM IST
दहीहंडीच्या वर्गणीसाठी तरुणांची दादागिरी, दुकानदाराला मारहाण करत केली तोडफोड title=

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा राज्यात मोठ्या उत्सहात सण साजरे करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने यंदा अधिकच उत्साह आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये त्याआधीच दहीहंडीच्या सणाला गालबोट लागलं आहे.

दहीहंडीसाठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून मिठाई दुकानदाराला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. राहुल गुप्ता असं मारहाण झालेल्या व्यावसायिकाच नाव आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी रात्री उशिरा वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाकड पोलिसांनी या प्रकरणी प्रसाद राऊत, मनोज कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ यांना अटक केली आहे. तर रोहित शिंदे, सुनील शेट्टी, विजय तलवारे याच्यासह 3 ते 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहटणी मधील राज स्वीट या दुकानात या तरुणांनी घोळका गेला होता. त्यांनी राहुल गुप्ता यांच्याकडे 500 रुपये वर्गणीची मागणी केली. यावेळी गुप्ता यांनी 100 रुपये देतो असं सांगितलं. त्यानंतर तरुणांनी राहुल गुप्ता यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर 200 रूपये देण्याची तयारी दर्शवूनही या टोळक्यांनी राहुल आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. तसेच दुकानाची तोडफोड करत गल्ल्यातील 10 ते 12 हजार रुपये घेऊन तिथून निघून गेले.

दरम्यान,पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तसेच वर्गणी मागताना नागरिकांची इच्छा असेल तेवढीच वर्गणी स्वीकारावी अशी सूचना पोलिसांनी केली आहे. कुणी बळजबरी करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.