पुणे : शिक्षणाचं माहेर घरं म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. मात्र गेले कित्येक दिवस पुण्यात शिक्षण घेणं विद्यार्थिंनींसाठी असुरक्षित असल्याच्या घटना समोर येत आहेत.
परदेशातून अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी भारतातील पुणे निवडतात. पण अशा ठिकाणीच त्यांना असुरक्षिततेची भावना होते. याची खंती आहे. पुण्यातील अशाच एका शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थिनीकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापकानी शरीरसुखाची मागणी केली. आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासली. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राध्यापकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पौड रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएचडीचे शिक्षण घेण्याच्या उद्देशाने प्रवेश घेण्यासाठी आली होती. ८ ऑगस्ट रोजी म्हणजे मंगळवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास ती प्रवेशाबाबत महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांना भेटली. मात्र शिवाजी बोऱ्हाडे यांनी तिला प्रवेश देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तिने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी घाबरलेल्या त्या इराणच्या तरुणीने याबाबत इराणमधील आपल्या पालकांना कळवले. तर पालकांनी केलेल्या सुचनेनुसार सदरील विद्यार्थिनीने कोथरूड पोलीस स्टेशन गाठत घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना तक्रार नोंदविली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही.