Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर आता पुणे राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
पुणे राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आहे. पुण्यात रात्रभर धडक कारवाई करण्यात आली आहे. रात्री दिलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ बार, पब आणि हॉटेल सुरु ठेवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात विशेष करुन अल्पवयीन मुलांना मद्य पुरवण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरु केली.
पुणे विभागात गेल्या 3 दिवसात 14 पथकांमार्फत धडक मोहिम राबवण्यात आली होती. यात जवळपास 32 पब, बार, हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. यात 10 रुफटॉप, 16 पब आणि 6 परवाना कक्ष बार यांचा समावेश आहे. यात जवळपास एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या बार,पब्जचे व्यवहार तात्काळ बंद ठेवण्यात आले असून सर्व परमिट सील करण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे.
दरम्यान रविवारी (19 मे) रोजी पुण्यात एका 17 वर्षाच्या मुलाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारने चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारुच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (24 वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन बाल हक्क न्यायालयाने रद्द केला आहे. त्या मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.