Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 27, 2024, 02:09 PM IST
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम title=

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी झालेल्या चौकशीची माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले, या अपघातप्रकरणी 120 B, 467, 201, 213 आणि 213 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील ससून डॉक्टरांवर गुन्ह्याच्या कटात सहभागी होणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. त्या दोन्हीही डॉक्टरांना पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे घेतलेले नमुने कचरा पेटीत टाकले. यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हलनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते.

औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि त्याच्या पोराचे सॅम्पल मॅच झाले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल मॅच झाला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला अटक केली आहे. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी हा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवालच्या फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल होता. ससून रुग्णालयातील पहिलाच रिपोर्ट पुणे आरोपीने नशा न केल्याचा आल्याने या प्रकरणांमध्ये संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा घेत ते खबरदारीचा उपाय म्हणून औंधमधील सरकार रुग्णालयामध्ये दिले होते. पोलिसांच्या तपासामध्ये श्रीहरीने हे कृत्य डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आहे. त्याने रक्ताचे नमुने बदलले होते.

खटल्यावर काही परिणाम होणार नाही

विशाल अग्रवलाच्या मुलाचे रक्ताचे नमुने 20 तासांनी घेण्यात आले आहेत. त्यात मद्याचा अंश आढळून आला नाही. याचा खटल्यावर काही परिणाम होणार नाही. कारण आरोपीने मद्य प्राशन केल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. रक्ताचे नमुने घेणे आणि अहवालामध्ये गडबड होऊ शकते, याची शंका पहिल्याच दिवशी आली होती. त्यामुळेच औंध हॉस्पिटलला DNA तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते, असे पोलिसांनी म्हटले. 

आतापर्यंत चार गुन्हे दाखल

विशाल अग्रवाल याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केलेला आहे. ड्रायव्हरचे अपहरण करुन मुलावरील गुन्हा स्वतःच्या नावावर घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्याप्रकरणी तसेच दारु पिण्यास संमती दिल्याप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या मंजुरीनंतर त्याला नवीन प्रकरणात अटक करण्यात येईल.