Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी

Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 04:22 PM IST
Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी title=
Pune Porsche Accident Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar On Pune Porsche Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाईचा धडाका सुरू केलाय. कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केलीय. अग्रवाल हा संभाजीनगर मध्ये असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अग्रवालला अटक केलीय. मात्र या सगळ्यामध्ये अग्रवाल याने पोलिसांनी गुंगारा देण्याचाही प्रयत्न केला. संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात जेएम प्लाझा अँड रेस्टॉरंट नावाचं अत्यंत साधं लॉज वजा हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये विशाल पोलिसांना गुंगारा देऊन थांबला होता. पोलिसांनी याच साध्या हॉटेलमधून अग्रवालला अटक केली. दरम्यान त्याचबरोबर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील (Koregoan Park) कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकाला पोलिसांनी अटक केलीय. त्यावरून आता राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे.

काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विशाल अग्रवालच्या अटकेची मागणी केली होती. अशातच आता विशाल अग्रवालच्या अटकेनंतर धंगेकरांनी पुणे पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी केलीये. तसेच सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) चेक करावं, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रकरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.

धंगेकर नेमकं काय म्हणाले?

कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमले. आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे. परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे. अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलीस स्टेशन व ससून मधील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करण्यात यावे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीसांना केली आहे. फडणवीसांना ट्विटवर टॅग करून धंगेकरांनी कारवाईची मागणी केली.

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर सुरुवातीला लावण्यात आलेलं कलम 304 -अ हे जामीनपात्र आहे. त्यामुळे त्याची तत्काळ मुक्तता होऊ शकली. मात्र आता कलम बदलण्यात आलं असून 304 लावण्यात आलंय. त्याप्रमाणे आरोपीकडून घडलेल्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता त्याला अल्पवयीन गृहीत न धरता सज्ञान समजण्यात यावं अशी विनंती पोलिसांकडून न्यायालयात करण्यात येणार आहे.