कबीर कला मंचच्या सदस्यांना कोरेगाव भीमात न जाण्याचे आदेश

 शौर्य दिनाला कोरेगाव भीमा येथे न जाण्याचे आदेश कबीर कला मंचच्या सदस्यांना देण्यात आले 

Updated: Dec 31, 2018, 10:38 PM IST
कबीर कला मंचच्या सदस्यांना कोरेगाव भीमात न जाण्याचे आदेश  title=

पुणे : 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिनाला कोरेगाव भीमा येथे न जाण्याचे आदेश कबीर कला मंचच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी या संदर्भात कबीर कला मंचच्या सदस्यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरवर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होऊन शौर्य दिन साजरा करत असतात. पण गेल्यावर्षी या ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गेल्यावर्षीची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. 

भीम आर्मीला नोटीस

शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी चैत्यभूमी येथून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भीम आर्मीला 2 तारखेपर्यंत  महाराष्ट्रात कोणतीही सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भीम आर्मीचे कार्यकर्त्यांना ते असलेल्या ठिकाणाहून तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पेलीस ठाण्यात 2 तारखेपर्यंत दररोज हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना 2 तारखेपर्यंत भीमा कोरेगांव इथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.  त्यानंतर भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या पुण्यातील सभांनाही परवानगी नाकारण्यात आली.

एकबोटे, भिडेंनाही प्रवेश बंदी 

 पुणे ग्रामीण पोलिसांनी शिव प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलीय. ३० डिसेंबर ते २ जानेवारी  दरम्यान संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना २ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. ते पुणे शहरात राहू शकतील परंतु पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येण्यास मात्र त्यांना मनाई करण्यात आली आहे. 

10 पट अधिक बंदोबस्त 

1 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या शौर्यदिनासाठी यावेळी कोरेगाव भीमामध्ये गेल्यावेळ पेक्षा 10 पट अधिक बंदोबस्त असणार आहे. इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावेळी अंदाजे 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे.