नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यात PMPLच्या चालक आणि वाहकाची मुजोरी समोर आली आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पीएमपीएलच्या चालक आणि वाहकाने केलेली ही प्रवाशांची सेवा.
चालक आणि वाहकाने सेवेचा हा प्रसाद दिलाय तो ही एका ज्येष्ठ नागरिकाला. या ज्येष्ठ नागरिकांची चूक काय तर, स्टॉपवर बस का थांबवली नाही असा विचारलेला जाब.
पीएमपीएल रुळावर आणण्यासाठी तुकाराम मुंडे जीवाचा आटापिटा करतायत. प्रसंगी राजकारणी, कामगार संघटना यांच्याशी पंगा घेतायत. पंगा घेण्याचा मुंडे यांचा कित्ता पीएमपीएलच्या या चालकाने आणि वाहकाने चांगलाच गिरवलाय, मात्र चुकीच्या पद्धतीने.
ज्या प्रवाशांच्या जीवावर पीएमपीएल सुरु आहे आणि ज्या प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून मुंडे प्रयत्नशील आहेत त्याच प्रवाशाला चालक आणि वाहकाने अशी सेवा दिलीय.
मोबाईलवर काढलेल्या व्हिडीओने पीएमपीएल चालक आणि वाहकाची मुजोरी पुढं आलीय. मारहाण झालेल्या पिरजादे यांनी तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही चालक वाहकाला सांगितले. मात्र तरीही त्यांची मारहाण सुरूच होती.
मुंडेंकडे तक्रार करणार म्हटल्यावर या वाहक आणि चालकाने आम्हीही एका मंत्र्याची माणसं आहोत, काय करायचं करा अशी दमबाजी केली. पोलिसांनी या दोघांवर अदखलपात्र गुन्हा तर दाखल केलाय. मात्र आता तुकाराम मुंडे काय कारवाई करतात याकडे या ज्येष्ठ नागरिकाचे आणि पीएमपीएलच्या प्रवाशांचे लक्ष आहे.