पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 25, 2024, 09:36 AM IST
पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live title=

Pune Drugs News : पुण्यात तीन दिवसांत पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 500 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे. तर या प्रकरणी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदमात पुणे पोलिसांनी छापा टाकून 55 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केलं होतं. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे रॅकेट सुरु असल्याचे वास्तव समोर आलं आहे. अशातच पुण्यातला तरुणाईलाही या ड्रग्जने विळखा घातल्याचे समोर आलं आहे. एका मराठी अभिनेत्याने या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.

पिट्या भाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता-दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी हा सगळा प्रकार समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन कॉलेज तरुणींनी ड्रग्जचं सेवन करुन नियंत्रणाच्या बाहेर गेल्या होत्या. रमेश परदेशी हे सकाळी व्यायामासाठी इथे आले असताना त्यांना हा प्रकार दिसला. रमेश परदेशी यांनी हा सगळा प्रकार फेसबुक लाईव्ह करुन समोर आणला. त्यांनी या दोन्ही मुलींना रुग्णालयात पोहोचवलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रमेश परदेशी यांनी दिली. मात्र या घटनेचा व्हिडीओ शेअर करु नका असे आवाहन देखील रमेश परदेशी यांनी केले आहे.

काय म्हटलंय अभिनेते रमेश परदेशी यांनी?

"शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर. त्यामुळं आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात 4 हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही," असे रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.