सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गीता मालुसरे... वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून ही जलराणी स्वीमिंग (Swimming) करतेय. 18 वर्षांची गीता आतापर्यंत अनेक जलतरण स्पर्धांमध्ये चॅम्पियन ठरली. देशासाठी ऑलिम्पिक मेडल (Olympic Medal) मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं. गेल्या नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग परिसरात झालेल्या स्पर्धेत तिनं सहभाग घेतला आणि घात झाला. समुद्रात पोहत असताना खतरनाक आणि विषारी अशा जेली फिशनं (jellyfish) तिच्या हाताला चावा घेतला. जेली फिशच्या दंशामुळं तिचा हात निकामी झालाच. पण चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नांनाही डंख बसलाय.
जेली फिशचं विष पसरल्यानं लचके तोडल्यासारखी गीताच्या हाताची अवस्था झालीय. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत चार ऑपरेशन झालीत. आणखी एक ऑपरेशन बाकी आहे. कदाचित तिच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करावी लागण्याची शक्यता आहे. जेली फिशचा दंश अत्यंत घातक असतो. त्यामुळं मृत्यूचा धोका देखील संभवतो. दुर्दैवानं भारतात अजूनही जेली फिशच्या दंशावर उपचार उपलब्ध नाहीत.
जेली फिशचा दंश, जीवाला धोका
- जेली फिश चावल्यानं त्वचा संसर्गाची भीती असते
- त्वचेचा रंग काळा, हिरवा किंवा पिवळा पडतो
- पेशंटचे स्नायू निकामी होतात, रक्तप्रवाह कमी होऊ शकतो
- जेली फिशचं विष जास्त प्रमाणात शरीरात राहिल्यास ते प्राणघातक ठरू शकतं
जी वेळ या स्वीमिंग चॅम्पियन तरुणीवर आली, ती कुणावरही येता कामा नये. त्यासाठी आयोजकांनी जलतरण स्पर्धा आयोजित करताना पुरेशी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. आणि त्याचवेळी जेलीफिशच्या दंशावर लवकरात लवकर उपचार पद्धती देखील विकसित होण्याची आवश्यकता आहे.