हे फक्त पुण्यातच होऊ शकते? कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी होणार

पुणे महापालिकेने आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना आता कुत्र्याप्रमाणेच भटक्या मांजरीचींही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. 

Updated: Nov 29, 2022, 08:33 PM IST
हे फक्त पुण्यातच होऊ शकते? कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी होणार title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : वेगवेगळ्या कारणांमुळे पुणेकर आणि पुणे नेहमीच चर्चेत असतात. आता पुणे चर्चेत आले आहे ते मांजरींची नसबंदी(Sterilization of cats) करण्याच्या निर्णयामुळे. पुणे महापालिकेने(Pune Municipal Corporation) घेतलेल्या या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.  

पुणे महापालिकेने आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना आता कुत्र्याप्रमाणेच भटक्या मांजरीचींही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. 

या निर्देशाची अंमलबजावणी करत पुणे महापालिकेने कुत्र्यांप्रमाणेच मांजरीची ही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवली आहे.  पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी याबाबत माहिती दिली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मांजरांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर त्यांना पुन्हा  सोडले जाणार आहे. 

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट आणि भटक्या मांजरी फिरतात.  भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरी देखील पुणेकरांसाठी उपद्रव ठरत आहेत.  यामुळेच पुणे महापालिकेने मांजरांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मांजरींची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.