पुणे : सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ शनिवारी दरड कोसळण्याची घटना घडली. कोसळलेल्या दरडखाली चिरडून पुण्यातील 31 वर्षांचा गिर्यारोहक हेमंत धिरज गाला याचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमंत गाला पुण्यातील मित्र मंडळ चौक इथं राहाणारा होता.
शनिवारी मध्यरात्री स्थानिक कार्यकर्त्यांनी घनदाट जंगलातील दिडशे फूट खोल दरीत उतरून दोराच्या साह्याने हेमंतचा मुत्युदेह बाहेर काढला.
हेमंतच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हेमंत कुटुंबातला एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे.
हेमंत याला ट्रेकिंग, गिर्यारोहणाची लहानपणापासून आवड होती. निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने राज्यातील गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले सर केले. हिमालयातही त्याने ट्रेकिंग केलं होतं. ट्रेकिंग स्पर्धेत त्याने मोठं यश मिळवलं होतं.
ट्रेकिंग स्पर्धेदरम्यान घडली दुर्घटना
सिंहगड एथिक्स ट्रेकिंग स्पर्धेत हेमंत गाला याच्या सह राज्यभरातील तीनशे ट्रेकर्स सहभागी झाले होते. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर तो बेपत्ता असल्याचं लक्षात आलं.