पुणे : पुणे जम्बो कोरोना हॉस्पिटलबाबत तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला दिली आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.
जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक आहे असं त्यांनी खडसावलं. बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात आणि उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. बैठकीला पुण्याचे महापौर, मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जम्बो कोव्हिड हॉस्पिटलचा ताबा काही दिवसांपूर्वी केलेल्या हलगर्जीपणामुळे एका खासगी फर्मकडून काढून संपूर्ण नियोजन महापालिकेकडे देण्यात आले आहे.
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर याचा या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यावेळी जम्बो हॉस्पिटल प्रायव्हेट फर्मकडे होतं.