पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली

पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे.

Updated: Sep 22, 2018, 08:46 PM IST
पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली title=

पुणे : पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा बापटांनी दिलाय. त्यामुळे या मंडळांच्या विसर्जनाबाबत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न असल्याचं बापटांनी सांगितलं. तसंच पोलीस बळाचा वापर न करण्याच्या सूचना दिलेल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकार डीजे व्यावसायिकांच्या विरोधात नाही, मात्र कायद्याचं पालन करण्याचं आवाहन यावेळी बापटांनी केलं.

डीजे डॉल्बीचा नागरिकांना त्रास होतो, त्यामुळे मी त्याच्या विरोधातच आहे, असं बापट म्हणाले. डीजेबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पालन करणं बंधनकारक आहे. एखादा कायदा केला तर त्याचे काही परिणाम भोगावे लागतात, असं वक्तव्य बापट यांनी केलं.

गणेशोत्सव काळातील २०१४ नंतरचे किरकोळ स्वरुपाचे १८३ गुन्हे सरकारने मागे घेतले आहेत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेता येत नाहीत. यावरून माझ्यावर आरोप करून राजकारण करू नये, असं बापट म्हणाले.

डीजेच्या वापराबाबत न्यायालयाचा अवमान होऊ नये याची खबरदारी घ्यावी, मंडळांनी काही अनुचित करू नये. न्यायालयीन लढाई न्यायालयीन मार्गाने लढू, त्यामुळे सर्व मंडळांनी सहकार्य करावं, अशी विनंती बापट यांनी केली. पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह अनेक मंडळानी कायद्याचं पालन करत मिरवणूक काढण्याबाबत सहमती दर्शवलीय, असं बापट यांनी सांगितलं.

विसर्जन मिरवणुकीतील डीजे-डॉल्बी वरील बंदी सरकारनं तात्काळ हटवावी, अन्यथा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय पुण्यातील काही गणेश मंडळांनी घेतलाय. सरकारनं घेतलेली भूमिका तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत दाखवलेली दिरंगाई, अन्यायकारक असल्याचं या गणेश मंडळांचं म्हणणंय. डॉल्बी व्यावसायीकांचा तर या निर्णयाला विरोध आहेच. आता गणेश मंडळांनी देखील प्रखर विरोधांचं हत्यार उगारलय. पुण्यातील १०० ते १५० मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतलाय.