ते सोन्यानं मढलेल्या महिलांना हेरून ठेवायचे आणि...

अशी होती या टोळीची मोडस ऑपरेन्डी...

Updated: Jul 18, 2018, 04:07 PM IST

पुणे : भरपूर सोनं घालणाऱ्या महिलांचा शोध घ्यायचा... तिची माहिती काढायची आणि मग तिचं सोनं लंपास करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. सोनं चोरून ही टोळी मध्यप्रदेशात दबा धरून बसायची. वाकड पोलिसांनी या टोळीला अटक केलीय. त्यांच्याकडून १६ लाख ३३ हजार रुपयांचं ४०१ ग्रॅम सोनं जप्त केलंय. विजय उर्फ छल्या गोपीनाथ चव्हाण, गोविंद लाडू काळे, शिवा किसन पवार अशी अटकेतल्या आरोपींची नावं. या तिघांचे साथीदार सोमनाथ चोबे आणि सुनील पवार फरार आहेत.

वजनदार सोनं परिधान करणाऱ्या महिलांचा शोध घ्यायचा... त्या महिलेची माहिती काढायची आणि ते कसं चोरायचं याचा प्लान बनवून तो अंमलात आणायचा... अशी या टोळीची मोडस ऑपरेन्डी... पिंपरी-चिंचवड परिसरात सोनं चोरून मध्यप्रदेशात जाऊन दबा धरणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. यामुळे सात पोलीस ठाण्यातील आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलीय.