पुणे : पुण्यातील एका गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी जमा केलेला पैसा, एका २२ वर्षाच्या अनाथ मुलाच्या उपचारावर खर्च केला आहे. या गणेश मंडळाच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ २० टक्के खर्च मंडळ हे गणेशोत्सवावर खर्च करणार आहे. उरलेले पैसे या अनाथ मुलाच्या उपचारासाठी खर्च होणार आहेत. या मंडळाचं हे पाऊल मानवतेच्या उत्सवाचं प्रतिक आहे.
देशभरात गणेशोत्सवाचं उत्साह आहे, पण मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवाची मज्जा काही औरच आहे. यावेळी पुण्यातील नवीपेठचं ५६ वर्ष जुनं नवशक्ती मित्र मंडळ चर्चेत आहे. पण यावेळी गणपतीची तयारी ही मानवतेच्या दृष्टीकोनातून एक उत्सवच आहे.
२२ वर्षाचा युवक सतीष जोरी एक स्थानिक नागरीक आहे. शनिवारी लोकांनी त्याला घरात फर्शीवर पडलेलं पाहिलं, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्यावर सर्जरी करण्याची गरज आहे.
मंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं की, सतिशच्या आईचा मृत्यू त्याच्या बालपणीच झाला होता. पाच वर्षाआधी त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. त्याचे केवळ एक काका होते, त्यांचा देखील काही वर्षापूर्वी मृत्यू झाला, तेव्हा सतीष या जगात एकटाच आहे. म्हणून मंडळाने सतिशच्या उपचाराची जबाबदारी घेतली कारण आपण सतीषला लहानाचं मोठं होत असताना पाहिलं असल्याचं मंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं.
मंडळाचे सदस्य पायगुडे यांनी सांगितलं, सतीशचं मेडिकल बिल, आणि त्याची काळजी घेणारं कुणीच नाहीय. म्हणून आम्ही त्याचं पालकत्व घेतं हॉस्पिटलचा खर्च उभारत आहोत. सतीशचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होईपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्येच थांबणार आहोत.
बाप्पा मदतीला धावून येईल, कार्यकर्त्यांच्या भावना
या वर्षी साधेपणा ही आमच्या मंडळाची ओळख असेल, मोठा उत्सव करता येईल, पण यासाठी एक वर्ष वाट पाहण्यात हरकत नाही. आम्ही आमच्या संस्कृतीशी संबंधित गोष्टी करत राहू, आम्ही केवळ उत्सव आणि आनंदाची भावना कायम ठेवू इच्छितो, आणि आम्हाला विश्वास आहे, अशा चांगल्या कामांसाठी बाप्पा आम्हाला नक्कीच मदत करेल, असं मंडळाचे कार्यकर्ते अशोक ठोंबरे यांनी म्हटलंय.