Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!

Pune Market Yard Fire Accident : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 13, 2024, 06:29 PM IST
Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न! title=
Pune Market Yard Fire Accident

Pune fire accident today : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 2 सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत 6 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सुदैवाने यात जीवितहानी नाही, एक जण किरकोळ जखमी झाल्याचं समोर आलंय. आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने 6 कुटुंबांचा संसार उघड्यावर पडलाय. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.

मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथील झोपडपट्टीला आग लागल्याने सध्या पुणे शहरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या झोपडपट्टीत अतिशय चिकटून घरं असल्याने मोठी आग लागण्याची शक्यता होती. मात्र, फायर ब्रिगेडने 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर पाठवल्याने मोठी दुर्घटना टळली. याआधी देखील वारंवार या भागात आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

डोंबिवलीत आठ मजली इमारतीला आग

डोंबिवली जवळील खोनी पलावा येथील डाऊन टाऊन या आठ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती. त्यानंतर ती आग पसरत इमारतीच्या खालच्या मजल्यापर्यंत पोहोचली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यापर्यत लोकं राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इमारतीमधील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निमशन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत अन् आगीवर नियंत्रण मिळवलं.

यवतमाळमध्ये आगीचा तांडव

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना काल रात्री घडली. ही घटना रात्री 11.45 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर दुकान व दुकानातील सुमारे 20 ते 25 लाखांचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.