कंस मामा! पुण्यात भर रस्त्यात भाचींना विवस्त्र करुन मारहाण, कारण ऐकून होईल संताप

भाच्याचा राग भाचींवर काढला, कंस मामाने भर रस्त्यात दोन भाचींना अमानुष मारहाण केल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ, कठोर कारवाईची होतेय मागणी

Updated: Feb 6, 2023, 07:39 PM IST
कंस मामा! पुण्यात भर रस्त्यात भाचींना विवस्त्र करुन मारहाण, कारण ऐकून होईल संताप title=
प्रतिकात्मक फोटो

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केली. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम मामाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

काय आहे नेमकं प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधला हा धक्कादायक प्रकार आहे. मामाच्या मुलीबरोबर भाच्याचे प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमप्रकरणाला मामाचा तीव्र विरोध होता. पण त्या दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे संतापलेल्या मामाने याचा सर्व राग मुलाच्या बहिणी म्हणजे आपल्या भाचींवर काढला. दोन बहिणींना त्याने भररस्त्यात मारहाण केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्या मुलींना विवस्त्र करत शिवागाळही केली. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून नराधम मामावर कठोर कावाईची मागणी केली जात आहे. 

पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. हवेली तालुक्याच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. पळून गेलेल्या मुलाने आपल्या बहिणींना विवस्त्र करुन झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हेमलता बडेकर यांना पाठवला. आपल्या मामाने मारहाण केल्याचा आरोप करत त्याने आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. झालेल्या प्रकाराचा गंभीर दखल घेत हेमलता बडेकर यांनी तात्काळ लोणीकाळभोर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर याप्रकरणी त्या नराधम मामासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.