पुण्याचा बिहार होतोय, विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत पुणे अशी ओळख बदलतेय का?

पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणा-या तिच्याच मित्रानं सदाशिव पेठेत भरदिवसा कोयत्यानं हल्ला केलाय. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होतोय.

सागर आव्हाड | Updated: Jun 27, 2023, 10:06 PM IST
पुण्याचा बिहार होतोय, विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत पुणे अशी ओळख बदलतेय का? title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातल्या (Pune) सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. या तरूणीचं नशीब बलवत्तर म्हणून दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder Case) पुनरावृत्ती टळली. शंतनू जाधव नावाच्या तरूणानं सदाशिव पेठेत भरदिवसा तिच्यावर कोयत्यानं (Koyata) हल्ला केला. ही तरूणी आपल्या एका मित्रासोबत स्कूटरनं जात असताना शंतून जाधवनं त्यांना अडवलं. त्यानंतर शंतनूनं भर रस्त्यावर बॅगेतून कोयता बाहेर काढला आणि त्याच्यावर तसंच स्कूटीवरील तरूणीवर वार केले. हा मित्र आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळाला तर शंतनूनं मुलीचा पाठलाग केला. मात्र दोन तरूणांनी शंतनूला पकडलं आणि या तरूणीचा जीव वाचला. 

आरोपी शंतनू हा मुळशीचा असून मुलगी कोथरूडची रहिवासी आहे. आणि दोघं कॉलेज मित्र असल्याचं मुलीनं म्हटलंय. त्याने मला लग्नासाठी विचारलं पण नाही म्हटल्याने तो जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या घरच्यांनाही याविषयी सांगितलं होतं. याचा राग मनात धरुन त्याने आपल्यावर वार केल्याचं या मुलीने सांगितलं. तर एकतर्फी प्रेमातून शंतनूनं मैत्रिणीवर हल्ला केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. 

त्यावेळी नेमकं काय घडलं?
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एसपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर हल्लेखोर तरुण आणि पीडित तरुणी आमने-सामने आले. दोघांची आधीपासून ओळख होती. दोघेही शिक्षणासाठी एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. नंतर दोघांचे बोलणे बंद झाले होते. तो मुलगा तिला सतत बोलण्यासाठी भाग पाडत होता. तिला फोन करत होता. तो इथे आला तेव्हा तिच्याबरोबर बोलण्याचा प्रय़त्न केला. तेव्हा त्यांच्यात भांडण झालं. यानंतर त्या तरुणाने बॅगेताल कोयता काढून तरुणीवर हल्ला केला. हल्ल्यात तिच्या हातावर आणि डोक्यावर जखम झाली आहे. 

सुसंस्कृत पुण्यावर प्रश्नचिन्ह
या घटनेनं सुसंस्कृत पुण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. गावखेड्यातील अनेक तरूण अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत येत असतात. मात्र अधिकारी घडवणारी हीच फॅक्ट्री आता गुन्हेगार घडवू लागलीय की काय असा सवाल उपस्थित होतोय. कारण दर्शना पवारच्या हत्याकांडाला आठवडा उलटत नाही तोवर सदाशिव पेठेत दुसरं हत्याकांड थोडक्यात टळलं. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजलीय. 

पुण्यातल्या दोन प्रकरणांमुळे एमपीएमसी करणाऱ्या तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळवत चालल्याचं विदारक वास्तव समोर आलंय. यामुळे मात्र पुण्याचा बिहार होतोय का अशी भीती निर्माण झालीय. या घटनांना वेळीच आळा घातला नाही तर अधिकाऱ्यांचं पुणं गुन्हेगारांचं व्हायला वेळ लागणार नाही.