पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, ना. म. जोशी यांनी एकत्र येऊन १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत अनेक प्रतिभावंत घडले. मात्र, आता याच शाळेत एक इतिहास घडला आहे.
पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केवळ मुलांसाठी असणाऱ्या या शाळेची दारे आता मुलींसाठी उघडण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल १३८ वर्षांनी या शाळेत मुलांसोबत मुलींनाही शिक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून न्यू इंग्लिश स्कूल शाळा चालवण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींनाही शिक्षण देण्याचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, ना. म. जोशी यांनी १९८० साली ही शाळा सुरु केली. १९३६ पर्यंत या शाळेत मुलं-मुली एकत्रित शिक्षण घेत असतं. १९३६ पर्यंत या शाळेत मुलींना प्रवेश दिल्याच्या नोंदीही कागदपत्रांमध्ये आहेत. तसेच नंतर अहिल्यादेवी शाळा ही मुलींची स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक नागेश मोने यांनी सांगितले की, "मुलांनी आणि मुलींनी एकत्रित शिक्षण घेणं गरजेचं आहे. यामुळे महिलांबद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल. म्हणूनच विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे". यंदा २५ मुलींना शाळेत पाचवीसाठी प्रवेश देण्यात आला आहे.