कोल्हापूर : ईव्हीएम हॅक न झाल्यास आम्ही सत्तेत येऊ असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही सत्तेवर आल्यास सिलेंडरमागे 100 रुपये अनुदान देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. लोकांना बदल हवाय हे महारॅलीच्या माध्यमातून दिसून आल्याचेही ते म्हणाले. कॉग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही विचारत नाही. आमची लढाई भाजपाशी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
गॅस सिलेंडर जनतेला परवडत नसल्याचे सांगत उज्वला गॅस योजनेत बिजेपीने काँग्रेसच्या कामाची कॉपी केल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. तसेच सत्तेत आल्यास लिंगायत धर्माला मान्यता देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसीची जनगणना करणार असल्याचेही ते म्हणाले.
एमआयएम सोबतच्या आघाडी संदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. आघाडी तुटल्याचे एमआयएमतर्फे जाहीर केल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी ही तलवार टांगती ठेवली होती. एमआयएमसाठी आमचे दरवाजे मोकळे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच लवकरच आघाडी जाहीर करू; 288 जागा लढण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होऊ देऊ नये याचा पुनरुच्चार यावेळी आंबेडकर यांनी केला. आदित्य यांना शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यात आले आहे. पण तसे न झाल्यास त्यांचा राहुल गांधी होऊ शकतो असा पुनरोच्चार त्यांनी केला.