प्रशांत अनासपुरे, झी 24 तास, मुंबई : प्रभादेवीचं रवींद्र नाट्य मंदिर म्हणजे मुंबईत रसिकांसाठी हक्काचं मध्यवर्ती ठिकाण मानलं जातं मात्र शॉर्ट सर्किटमुळे या नाट्यगृहाचे दरवाजे रसिकांसाठी बंद झाले आहेत. हे नाट्यमंदीर रसिकांसाठी अगदी हक्काचं ठिकाण आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असो की नाटकांचे विविधांगी प्रयोग, इथे रसिकांची गर्दी नेहमी होते. मात्र हेच नाट्यगृह दरवर्षी समस्यांच्या गर्तेत अडकताना पहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इथे सुरू असलेला नाटकाचा प्रयोग अर्धवटपणे थांबवावा लागला. आता नाट्यगृहाची दुरूस्ती कधी पूर्ण होणार आणि नाट्यगृह पुन्हा सुरळीतपणे केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
याबाबत लवकरात लवकर नाट्यगृह सुरू करू असं रवींद्र नाट्य मंदिरचे संचालक बिभीषण चावरे यांनी सांगितले आहे. मात्र सरकारी पातळीवर प्रत्यक्षात हालचाली होणे अपेक्षित आहे. मोठा गाजावाजा करत नाट्यगृहाच्या या इमारतीचं उदघाटन 2013 मध्ये करण्यात आलं होतं. मात्र कालांतराने बॅकस्टेजच्या अपुऱ्या सोयीसुविधा, मेकअप रुममधील गैरसोयी यामुळे कलाकार नाराजी व्यक्त करत असतात. अऩेकदा विविध पक्षांचे मेळावे आणि सरकारी कार्यक्रमांसाठीही या नाट्यगृहाचा वापर होतो. मात्र प्रशासनाकडून नाट्यगृहाच्या सुविधांबाबत अनेकदा हलगर्जीपणा आढळून येतो.
अलीकडच्या काळात तर दर दोन-तीन वर्षांनी इथल्या संचालकांची बदली होते. त्यामुळे इथे ठोस अशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. आता नव्याने आलेल्या बिभीषण चावरे यांनी इथला संचालकपदाचा कारभार हाती घेतला आहे. नाट्य गृहाची बिघडलेली विद्युत यंत्रणा लवकरात लवकर दुरूस्त होईल आणि योग्य सोयीसुविधांसह नाट्यगृह लवकरात लवकर रसिकांसाठी खुले होईल अशी आशा रसिक प्रेक्षकांना आहे.