'राज'गर्जना आधी औरंगाबाद राजकीय वातावरण तापलं, परवानगीबाबत पोलिसांचं बैठकांचं सत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेआधी औरंगाबादमध्ये वातावरण तापलं असून अनेक जण या सभेला विरोध करत आहेत.

Updated: Apr 20, 2022, 10:22 PM IST
'राज'गर्जना आधी औरंगाबाद राजकीय वातावरण तापलं, परवानगीबाबत पोलिसांचं बैठकांचं सत्र title=

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackerayयांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सभेला पोलीस आयुक्तांनी परवानगी देऊ नये असं निवेदन अनेक संघटनांनी दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे जातीय तेढ निर्माण होईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी व्यक्त केली आहे. 

औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडी करणार असलेल्या मुस्कान खानच्या सत्कार सभेला परवानगी नाकारली तशी राज यांच्या सभेला परवानगी नाकारावी आणि राज ठाकरेंवर आयपीसी 153 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. 

सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी जंगी सभा होणारच अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी ज्या सांस्कृतिक मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आलीय त्याठिकाणी पाहणी केली. 

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबादमध्ये  विरोध वाढतो आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सभेला परवानगी देऊ नये असं निवेदन अनेक संघटनांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अॅक्शन कमिटीसह अनेक संघटनांनी सभेला परवानगी देऊ नये म्हणून निवेदन दिलं आहे.

दुसरीकडे मनसेने परवानगीसाठी पोलीस आयुक्तांना अर्ज दिला आहे. यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. स्थानिक पातळीवर मनसे पदाधिका-यांच्या बैठका सुरु आहेत.