कल्याण : जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं सकाळी 11 वाजेपासून बंद ठेवण्याचे आदेश असतानाही कल्याणमध्ये काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरुच ठेवली होती. अखेर पोलिसांनी सर्वत्र शहरातील सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दुकानदार आणि व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काल एक परिपत्रक काढत कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक सेवा, वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याला बहुतांश दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. तर काही अतिशहाण्या दुकानदार आणि व्यावसायिकांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत नेहमीप्रमाणे आपली दुकाने 11 नंतरही सुरूच ठेवली.
अखेर स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर उतरत संबंधित दुकानदारांना आपापली दुकाने बंद ठेवण्याची कडक समज दिली. त्यानंतर दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.
दरम्यान लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी समाजातील प्रतिष्ठित आणि दक्ष नागरिकांनी केली आहे.