रत्नागिरी : आंबेनळी बस अपघात प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला. या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप करत या अपघातातील मृतांचे नातेवाईक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला असून प्रकाश सावंत देसाईच बस चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच नार्को टेस्ट करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे केली. तर प्रकाश सावंत देसाईला विद्यापीठानं सक्तीच्या रजेवर पाठवलंय.
२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३१ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते. अपघाताला एक महिना पूर्ण झाला असून बुधवारी मृतांच्या नातेवाईकांनी दापोली कृषी विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारीही उपस्थित होते.