PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा शपथविधी सोहळा (Oath-Taking Ceremony)पार पडतोय. एनडीएच्या (NDA) घटकपक्षातील मंत्र्यांचाही आज शपथविधी होणारे...यासाठी दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरूये. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. विदेशी पाहुणेही दिल्लीत दाखल झालेत. तर महाराष्ट्रातून 6, उत्तर प्रदेशातून 9, बिहारमधून 8, गुजरातमधून 6, ओडीशातून 3, कर्नाटकमधून 5, मध्यप्रदेशातून 4, गोव्यातून आणि जम्मू काश्मीरमधून प्रत्येकी एक असे एकूण 48 खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे. पण यात अजित पवारांच्या राष्टवादीला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही.
रोहित पवारांचा हल्लाबोल
यावरुन शरद पवार गटाचे नेत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळालीय. त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय. अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही देणंघेणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून, अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही. निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडी वर भाष्य करू नये असा फलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय...
'अजित पवार गटाला ऑफर होती'
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगितलं. अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाबाबत बैठक झाली त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र कॅबिनेट मंत्री राहिले असल्यानं राज्यमंत्री करता येणार नाही असं पटेलांचं मत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं, भविष्यात त्यांचा विचार होईल असंही फडणवीस म्हणालेत.
महाराष्ट्राचे सहा मंत्री
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यात भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत. तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय.
पण नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही अशी माहिती भाजप हायकमांडकडून मिळालीय. राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आलंय. याआधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. यावेळी दोन्ही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीये.