ऑनर किलिंग : प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरूणाचा खून

महाराष्ट्राला हादरवणारी घटना 

Updated: Jun 9, 2020, 03:35 PM IST
ऑनर किलिंग : प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरूणाचा खून  title=

पिंपरी चिंचवड : शहरात प्रेमप्रकरणातून एका २० वर्षीय तरूणाचा खून झाला आहे. हा खून मुलीच्या कुटुंबातील सहा जणांनी केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाच वातावरण आहे. 

विराज विलास जगताप असं या २० वर्षीय तरूणाचं नाव असून यावर मुलीच्या कुटुंबातील सहा जणांनी हल्ला केला. यामध्ये मुलीचे वडिल, काका, सख्या आणि चुलत भावांचा समावेश आहे. अशा एकूण सहा जणांचा समावेश असून यामध्ये दोन अल्पवयीन देखील आहेत. यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर येथील ही घटना आहे. मयत तरूणाचं आपल्या मुलीवर प्रेम असल्याचं लक्षात आल्यावर तरूणीच्या वडिलांनी विराजवर हल्ला केला. प्रकार असा घडला की, तरूण दुचाकीवरून जात असताना  तरूणीच्या कुटुंबियांनी टेम्पोने धडक दिली. या धडकेत तरूण खाली कोसळला. त्याचा पाठलाग करत असताना तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरूण जबर जखमी झाला. 

तात्काळ विराजला खासगी रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात नेमकं महाराष्ट्रात काय सुरू आहे असा प्रश्न विचारला जात आहे? या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.