सावित्री पुलासारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांचं उपोषण

कोकणातील प्रवासासाठी पर्याय ठरलेल्या पाली – खोपोली मार्गावरील जांभुळपाडा येथील पूल अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.

Updated: Sep 6, 2017, 10:09 PM IST
सावित्री पुलासारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांचं उपोषण title=

रायगड : कोकणातील प्रवासासाठी पर्याय ठरलेल्या पाली – खोपोली मार्गावरील जांभुळपाडा येथील पूल अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. या पूलाची दुरूस्ती तातडीने करावी या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांनी आता उपोषणाचा मार्ग पत्करलाय.

रायगड जिल्ह्यातला सुधागड हा तसा आदिवासी बहुल तालुका. याच तालुक्यातील महत्त्वाचा पाली-खोपोली मार्गावरील जांभुळपाडा गावाजवळील नदीवरील पूल धोकादायक झालाय. हा पूल वरून मजबूत दिसत असला तरी आतून पूर्ण पोखरलाय.

या पुलाचं प्लास्टर आतील बाजूनं गळून पडलंय. दगडी खांब देखील कमकुवत झालेत. त्यामुळे कधीही हा पूल कोसळेल अशा स्थितीत आहे. या पुलाची तातडीनं दुरुस्ती करावी यासाठी या भागातल्या लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुलाजवळच उपोषण सुरू केलंय.

रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी दुरुस्तीचं काम दोन महिन्यात सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र काम सुरू होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा ठाम निर्धार आंदोलकांनी केलाय.

50 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी अनेकदा केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं. पाली खोपोलीरस्ता आता राष्ट्रीय महामार्ग घोषित झालाय.

या मार्गावरील वाहनांची संख्याही कमालीची वाढलीय. अवजड वाहनं देखील याच मार्गावर ये जा करत असतात. कोकणात जाणारे प्रवासी मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या पुलाची तातडीनं दुरुस्ती होणं गरजेचं आहे.  

सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचा दावा शासनाकडून केला जातोय. परंतु त्यातील नादुरुस्त आणि धोकादायक पुलांकडे एखादी दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष जाणार का हाच खरा सवाल आहे.