पुणे : राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत. टीईटी, म्हाडा आणि आरोग्य भरती परीक्षेत गैरकारभार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर आता लष्करी परीक्षेचाही पेपर लिक झाल्याचं समोर आलं आहे.
आतापर्यंत चौघांना अटक
लष्करी परीक्षेचा पेपर लिक केल्याप्रकरणी एका लेफ्टनंट कर्नलसह चौघांना सीबीआयनं अटक केली आहे. लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई आलोक कुमार आणि आलोकची पत्नी प्रियंका यांना सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटनं बेड्या ठोकल्या आहेत.
सीबीआयने असा रचला सापळा
2019 साली सैन्याच्या 'क' दर्जाच्या पदांची भरती झाली होती. या परीक्षेची 'अन्सर की' आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर आरोपींवर नजर ठेवण्यात आली. त्यांचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. त्यात चौघांनी 40 ते 50 हजारांत उत्तर पत्रिका विकल्याचं आढळून आलं होतं.
लेफ्टनंट कर्नल रायझादा आणि हवालदार नाहक हे पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत आहेत. तर अलोक कुमार रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. या चौघांचा 2021मध्ये झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचं आढळून आलं आहे.