पालघर : काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण तरुणाला त्याचा स्टंट चांगलाच जीवावर बेतता बेतता राहिला. असं धाडस जीवावर बेतू शकतं हे माहीत असतानाही त्याने ते केलं पण जे पुढे घडलं ते तो आयुष्यभर विसरणार नाही. असं धाडस तो पुन्हा कधीच करणार नाही.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर रेल्वे स्थानकात मालगाडीखालून रुळ ओलांडणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं असतं. बुधवारी रात्रीची ही घटना आहे. मालगाडी थांबलेली असताना एक व्यक्ती मालगाडीखालून रुळ ओलांडत होती. पण त्याचक्षणी मालगाडी सुरु झाली आणि ही व्यक्ती खाली अडकली.
यावेळी हे दृश्य पाहणा-या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. पण तिथल्या कर्मचा-यांनी तातडीनं रेल्वे व्यवस्थापकाला माहिती दिली आणि मालगाडी थांबवली.
ही व्यक्ती मालगाडीखाली झोपल्यानं या व्यक्तीचा सुदैवानं जीव वाचला. गाडी थांबल्यानंतर ही व्यक्ती मालगाडीखालून बाहेर आली. पण, असं धाडस कशासाठी करायचं? जीव गेला असता तर किती महागात पडलं असतं. त्यामुळे तुम्ही कधी असं धाडस करू नका.