ZP School Teachers Protest: विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून अंदाजे ४० हजार शाळा आज बंद राहतील. राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात येणार आहे. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरलेत.
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यातील शिक्षक आज आंदोलन करणार आहेत. शिक्षक संघटनातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील काही ठिकाणी शाळा बंद राहणार आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, काळी फित लावून काम करणे, अशाप्रकारचे विरोध दर्शवण्यात आले होते. मात्र, आता शिक्षकांनी एक दिवसांची रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश शाळेंवर पोहणार आहे.