कोकण रेल्वे नोकरीत भूमिपुत्रांनाच संधी हवी - शिवसेना

कोकण रेल्वे भूमिपुत्रांवर अन्याय करत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 20, 2019, 11:16 PM IST
कोकण रेल्वे नोकरीत भूमिपुत्रांनाच संधी हवी - शिवसेना title=
रत्नागिरी कोकण रेल्वे आणि शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवर

मुंबई : कोकण रेल्वे भूमिपुत्रांवर अन्याय करत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोकण रेल्वेत भूमिपुत्रांना नोकरी मिळाली नाही तर हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने कोकण रेल्वे प्रशासनाला दिला आहे. भूमिपुत्रांवर अन्याय, होत असल्याची बाब कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांच्या निदर्शनास शिवसेनेच्यावतीने आणून देण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील ज्या ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पात गेल्या आहेत त्या घरातील प्रत्येक वारसाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टपणे बजावले. कोकण रेल्वेमध्ये भूमिपुत्रांचे असणारे प्रश्न आणि समस्या यावर तोडगा काढण्याबाबत बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी समाधानकारक चर्चा करण्यात आली. 

कोकण रेल्वेकडून भूमिपुत्रांना सापत्नक वागणूक मिळत आहे. कोकण रेल्वे प्रशासन भूमिपुत्रांवर कशाप्रकारे अन्याय करीत आहे हे निदर्शनाला आणून देण्यात आले. कोकण रेल्वेमध्ये भूमिपुत्रांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, या राज्यांमध्ये नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याची बाब खासदार राऊत यांनी लक्षात आणून दिली. यापुढे असे न होता भूमिपुत्रांना कोकण रेल्वेमध्ये नोकरीमध्ये त्यांच्या असणार्‍या शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्य मिळावे, असे शिवसेनेच्यावतीने निक्षून सांगण्यात आले. यावर ती सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन संजय गुप्ता यांनी दिले. रत्नागिरी येथील रेल्वे मुख्यालयात कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि खासदार विनायक राऊत यांची चर्चा झाली. यावेळी आमदार राजन साळवी, रत्नागिरी विभागीय प्रबंधक शेंडे, कोकण रेल्वे रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विलास खेडेकर, संतोष हुमणे, विश्वास राणे, लालबहादूर कनोजिया, विकास पेजे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, रत्नागिरी कोकण रेल्वे आणि शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता उपस्थित होते. खासदार विनायक राऊत, आमदार साळवी, विलास खेडेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.