कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात धक्काबुक्की, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Bandh In Kolhapur : कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात  आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे.  

प्रताप नाईक | Updated: Jun 7, 2023, 11:45 AM IST
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात धक्काबुक्की, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न title=
Bandh In Kolhapur Today Angry Protests Hindutva organizations

Bandh In Kolhapur : कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. कायदा सुव्यवस्थेचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राडा पाहायला मिळाला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात जमावाने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत.

आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केल्याने संतापाची लाट

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केल्याने संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. धरणे आंदोलनानंतर कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, सीपीआर आणि दसरा चौकात दगडफेकीच्या घटना घडल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलनकांना पांगविण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र

शिवराज्याभिषेक दिनी घडलेल्या या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्यानंतर आंदोलन सुरु केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव होता. शिवाजी चौकात जमल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आंदोलनाला सुरुवात केली.

 दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज नाही, तक्रार न घेतल्यास त्याची जबाबदारी माझी असेल. हिंदुत्ववादी संघटनांनी बंद मागे घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. मात्र, आंदोलन करण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत मनाई आदेश

दरम्यान, आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला आहे. पुन्हा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा स्टेटस व्हायरल होऊन कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या मध्यरात्री 12 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणे, सभा, मिरवणूक, सभा घेण्यास मनाई आहे.