मिरज : मिरजच्या शासकीय वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना पंधरा हजार रूपयांचे प्रशासकीय शुल्क भरण्याची नोटीस सांगली महापालिकेनं आज बजावली आहे.
जैव कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता, तो कचरा रुग्णालय परिसरात उघड्यावर टाकण्यात आला होता, त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे. जैव कचऱ्याची योग्य विलेहवाट लावण्याबाबत महापालिकेने 31 जुलै 2017 रोजी अधिष्ठाता यांना नोटीस बजावली होती मात्र, नोटीस देऊनही शास्त्रोक्त पद्धतीनं जैव कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नव्हती.
यानंतर मनपाच्या स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी, मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय परिसरात जाऊन तपासणी केली आणि जैव कचऱ्याच्या जागेचा पंचनामा केला. रुग्णालय परिसरातील, या तपासणी आणि पंचनाम्याचं मनपाने व्हिडीओ चित्रण सुद्धा केलेले आहे.
मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी पंधरा हजार रूपयांचं शुल्क न भरल्यास आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण मंडळ आणि आरोग्य मंत्रालयाकडे या बाबतचा अहवाल पाठवण्याचा मनपाने इशारा दिला आहे.