औरंगाबाद कचरा कोंडीचा १४ वा दिवस, प्रश्न न सुटल्याने नाराजी

औरंगाबादच्या कचरा कोंडीचा १४  दिवस आहे, आणि प्रश्न अजूनही कायम आहे. कोर्टान ताशेरे ओढल्यावरही पालिका अजूनही तोडगा काढू शकली नाही. त्यामुळं आता हा प्रश्न असाच राहणार आणि शहराचे कचराबाद होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2018, 07:30 PM IST
औरंगाबाद कचरा कोंडीचा १४ वा दिवस, प्रश्न न सुटल्याने नाराजी title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा कोंडीचा १४  दिवस आहे, आणि प्रश्न अजूनही कायम आहे. कोर्टान ताशेरे ओढल्यावरही पालिका अजूनही तोडगा काढू शकली नाही. त्यामुळं आता हा प्रश्न असाच राहणार आणि शहराचे कचराबाद होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

औरंगाबादला बकाल स्वरुप 

ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादला असं हे बकाल स्वरुप आलंय. रस्त्यावर जागोजागी कच-याचे ढीग साचलेत. पालिका कचराकोंडी दूर करण्यात अपयशी ठरलीय. नारेगाववासियांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शवत आंदोलनाचं हत्यार उपसलं. त्यावेळी सुरुवातीला पालिकेनं याकडं दुर्लक्ष केलं. 

आंदोलन चिघळल्यानंतर पालिकेचे प्रयत्न

मात्र आंदोलन चिघळल्यानंतर पालिकेचे प्रयत्न सुरु झाले. तोवर हातातून वेळ निघून गेली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचल्यानं शहराची जणू नाकाबंदीच झाली. त्यात हायकोर्टानंही पालिकेची कानउघडणी केली. मात्र त्यातही काहीही तोडगा निघाला नाही. आता खुद्द महापौर रस्त्यावर उतरुन कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतातयत. मात्र पदरी निराशाच. 

मिटमिटा भागातही कच-याच्या गाड्या पाठवण्यात आल्या. मात्र तिथं नागरिकांनी थेट गाडीच जाळली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालिकेला तिथूनही माघार घ्यावी लागली. 

नागरिकांचा कडाडून विरोध

आयुक्त दीपक मुगळीकर पोलिस बंदोबस्तात हनुमान टेकडी भागात कच-याच्या गाड्या घेऊन गेले. मात्र तिकडंही नागरिकांनी कडाडून विरोध केल्यानं आयुक्तांना आल्या पावली परतावं लागलं. महापौर घोडेले यांनी कांचनवाडी भागात कच-याच्या गाड्या नेल्या. तिथं नागरिकांना विनवणी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना हातही जोडली. मात्र तिथंही विरोध झाला. 

कचराकोंडी फोडण्यात अपयश 

कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याने पालिकेची नाचक्की झालीय. त्यामुळे जाये तो जाये कहा अशी अवस्था पालिकेची झालीय. यावरुन राजकारणही चांगलंच रंगलंय. मात्र शहरवासियांना होणा-या त्रासाची जबाबदारी पालिका घेणार का?, कचरा कोंडी फुटणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.