धुळ्यामध्ये दीड ते दोन महिन्यांपासून पावसानं दडी

धुळ्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसानं दडी मारलीय. आणि त्यामुळे पीकं तर करपलीच आहेत. 

Updated: Aug 19, 2017, 03:36 PM IST
धुळ्यामध्ये  दीड ते दोन महिन्यांपासून पावसानं दडी title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसानं दडी मारलीय. आणि त्यामुळे पीकं तर करपलीच आहेत. शिवाय खरीप हंगामही हाताचा गेलाय. तर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय. 

 धुळ्यामध्ये 80 टक्के शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खरीपाच्या हंगामात जे पीक घेतलं जातं. ते वर्षभरासाठी शेतक-यांसाठी आधार असतं. जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. 

जूनच्या सुरुवातीला जो पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसानं जिल्ह्याकडे पाठच फिरवलीय. त्यामुळे पीकं करपली आहेत. कपाशी, मका आणि मूग या पिकांचं मोठ नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. 

मुसळधार पाऊसच पडला नसल्यानं जलस्रोतांची पाणी पातळी वाढलेलीच नाही. दुबार पेरणी करूनही निसर्गानं शेतक-यांना तारण्याऐवजी मरणाच्या दारावर नेऊन उभ केलंय. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय. त्यामुळे पुन्हा शेतक-यांना सरकारकडे मदतीची आर्जव करावी लागतेय. 

जिल्ह्यातील अनेक भागात तर शेतातील ढेकळंही ओली झालेली नाहीत. जमिनीला पडलेल्या भेगा आणि करपलेली पीकं शेतक-यांच्या हिंमतीला सुरुंग लावतायत.