सांगली-कोल्हापुरात पुराचं थैमान, मराठवाडा मात्र कोरडाच

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील नद्या, धरणं अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.

Updated: Aug 12, 2019, 03:59 PM IST
सांगली-कोल्हापुरात पुराचं थैमान, मराठवाडा मात्र कोरडाच title=

औरंगाबाद : एकीकडे सांगली- कोल्हापूरमध्ये महापुराने अक्षरशः थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील नद्या, धरणं अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. मराठवाड्यात काही मोजक्या भागात पावसाच्या तुरळक सरी आल्य़ा आहेत. पण जमीन मात्र कोरडीच आहे. बीडमध्ये अजूनही नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. परभणीतही फक्त २ ठिकाणी पाऊस झाला आहे.

मराठवाड्याकडे पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. वाशी, उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हिंगोलीत ही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील नागरिक ढगांकडे आशा लावून आहेत. आकाशात दिसणारे ढग कोसळणार कधी असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. 

मराठवाड्यात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी सुरु आहे. काही ठिकाणी योग्य प्रमाणात ढग नसल्यामुळे प्रयोग अपयशी ठरले. एकीकडे राज्यभरात जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. पण मराठवाड्याच्या वाट्याला अजूनही पाऊस आलेला नाही. त्यामुळे आता कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु झाला आहे.