मुकुल कुलकर्णी, नाशिक : शहरात टोइंग कर्मचार्याकडून वाहनधारकांची लूट केली जातेय. जमा केलेली गाडी पैसे घेऊन सोडून देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टोईंगमागे सुरु असणारी आर्थिक देवाणघेवाण उघडकीस आलीय. याबाबतीत कारवाई करण्याऐवजी पोलिसांची मूग गिळून गप्प आहेत.
नाशिकच्या वकीलवाडी परिसरातला हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. टोईंग कर्मचा-यांनी उचललेली गाडी परत उतरवण्यासाठी पैसे घेतल्याचा हा व्हीडीओ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून टोईंग कर्मचा-यांविषयी नाराजी उघड व्यक्त होत होती.
वाहतुकीला अडथळा न ठरणारी गाडीही उचलली जात होती. गाडी उतरवण्याची विनंती केल्यावर हुज्जत घातली जात होती, अरेरावी, दमदाटीही केली जात होती. आता या व्हीडीओने या कर्मचा-यांकडून केली जाणारी लूटच उघड झालीय.
खासगी ठेकेदाराला वाहनं उचलण्याचं काम वाहतूक पोलिसांनी दिलंय. त्यातून लाखो रूपयांचा महसूल गोळा केला जातो. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय. शहरात पार्कींगची सोय नाही आणि गाडी सतत टो केली जाते यामुळे नागरिक हैराण झालेत. त्यातच आता टोईंग कर्मचारी करत असलेल्या आरेरावीविरोधात आणि पैशांच्या या व्यवहारांबाबत पोलीस अधिकारीच नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प आहेत.