मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपला स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरील मजबूत पकड, आश्वासनपूर्तीबाबत ओळखले जातात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये ते आपल्या स्वीय सहाय्यकाला एअर एम्बुलन्सने चेन्नईला नेण्याचा किस्सा सांगत आहेत.
ही घटना यावर्षी कोरोना काळात घटना घडली. नितीन गडकरी यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक मंडलेकर यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना नागपुर येथील विवेका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर नितीन गडकरी यांनी त्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यावेळी आम्ही हरलो, काही करु शकत नाही असं डॉक्टरांनी गडकरींना सांगितलं. चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण आयसीयूमध्ये आणि ऑक्सिजनवर असल्याने त्यांना नेणं हे जिकरीचं होतं असे गडकरी म्हणाले.
स्वीय सहाय्यकाचे वडील हे गडकरींना मोठ्या भावासारखे होते. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या ऑफिसच्या स्वीय्य सहाय्यकांना एअर अॅम्बुलन्सची सोय करण्यास सांगितलं. तसेच एमजीएम रुग्णालयासोबत देखील चर्चा केली. अमेरिकेतील डॉक्टरांसोबत देखील बोलणी झाली.
त्यावेळी अॅम्ब्युलन्सवाला 35 लाख रुपये अॅडव्हान्स मागत होता. संध्याकाळी सहा वाजल्याने सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. त्यावेळी गडकरींनी त्यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या को – ऑपेरेटिव्ह बँकेच्या सीईओंना फोन करुन बोलावलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का? असं विचारलं. आणि 35 लाख रुपये दुसऱ्या दिवशी देण्याच्या अटीवर मागितले. त्यानंतर त्याच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात यशस्वी उपचार झाल्याचे गडकरी म्हणाले.
बरा झाल्यानंतर तो भेटायला आला तेव्हा लहान मुलासारखा रडत होता. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मृत्यूला हात लावून परत आला आणि पुन्हा काम करु लागला याचा मला मनस्वी आनंद झाल्याचे गडकरी म्हणाले. हा किस्सा सांगितल्यानंतर गडकरींनी एक महत्वाचा संदेश व्हिडीओतून दिलाय. ते म्हणतात, 'केवळ सत्ता, संपत्ती हेच आयुष्याचं टार्गेट नसतं. सत्ता, संपत्ती ही केवळ माध्यमं आहेत, उद्दिष्ट असू शकत नसल्याचे गडकरी म्हणाले.
मंत्रिपद किंवा किती सर्वोच्च सत्ता मिळाली तरी त्यातून काही समाधान मिळतं असं नाही. संपत्ती कितीही मिळाली तरी समाधान मिळत नाही. संपत्ती मिळवली तर कलह निर्माण होतो आणि परिवार दुःखी होतो. असं आपण अनेक लोकांच्या जीवनात पाहतो असे ते म्हणाले.
जिथे गरिबी असते तिथे आनंद असतो आणि श्रीमंत घर म्हटलं की अडचणी वाढतात. पण या सगळ्या परिस्थितीमधून एका पारिवारिक भावनेतून, सामाजिक दायित्वातून एकमेकांशी व्यवहार करणं खूप महत्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले.
प्रशासनात काम करत असताना सकारात्मकता ठेवणं महत्वाचं आहे. कायदा हा शेवटी जनतेकरिता आहे. गांधीजींनी सुद्धा सांगितलंय की कायदा हा गरीब शोषितांच्या हिताकरिता वेळ पडली तर तोडावा. त्यासाठी मागे पुढे पाहू नये, असं गडकरी व्हिडीओच्या शेवटी म्हणाले.
या व्हिडीओतून गडकरींनी कोणत्या गोष्टीची पर्वा न करता स्पष्टपक्तेपणाचं उदाहरण आपल्या भाषणातून दिलंय. यातून राजकारणात आणि इतर सर्वच क्षेत्रातील मंडळींनी बोध घेण्यासारखा आहे.