ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आज राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी ते शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा होती. निरंजन डावखरे हे भाजपकडून कोकण पदवीधरची निडवणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र आहेत.
निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. ठाण्यामध्ये भाजपला यामुळे एक तरुण चेहरा मिळणार आहे. वसंत डावखरे यांचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठं वर्चस्व आहे. निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे तर पालघर निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.