'...तर त्यांचे आनंदाने स्वागत करु', जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार गटातील नेत्याचं सूचक वक्तव्य

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

Updated: Jun 3, 2024, 11:45 AM IST
'...तर त्यांचे आनंदाने स्वागत करु', जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार गटातील नेत्याचं सूचक वक्तव्य title=

Anil Patil Big Statement On Jayant Patil : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी वक्तव्य केले आहे. जयंत पाटील हे अत्यंत मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी असलेले नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील यांची पक्षात घुसमट सुरु आहे आणि आम्ही बाहेर पडल्यानंतर ती वाढली, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. 

"जयंत पाटील यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते असायचे. पण वरिष्ठांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्याने रोहित पवार यांना पुढे केलं जायचं. याचीच घुसमट जुन्या नेत्यांमध्ये सातत्याने वाढत आहे. यापूर्वीही मी ती पाहिली आहे. त्यामुळे नवीन नेत्याच्या हाताखाली आम्ही कसं काम करायचं? आमचं भविष्य काय असणार आहे, याची चिंता प्रत्येकाला आहे. त्यांची मनधरणी करण्याइतका मी एवढा मोठा नेता नाही. मात्र चांगले नेते राष्ट्रवादी अजित पवार गटांसोबत काम करण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागत करण्यासाठी आनंदच असेल”, असं अनिल पाटील म्हणाले.

"त्यांचे स्वागत अजित पवार सुद्धा करतील"

"जयंत पाटील येतील का की येणार नाहीत? हे मी सांगणार नाही. मात्र चांगले नेते हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील, त्यांचे स्वागत अजित पवार सुद्धा करतील. सुनील तटकरे हे सुद्धा करतील", असे अनिल पाटील यांनी सांगितले.  

"पक्षातून घालवण्यासाठी रात्रंदिवस लोकांचे प्रयत्न"

"लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फुटीच्या नावाखाली इमोशनल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. चार तारखेनंतर भविष्यामध्ये आपल्याला अनेक घडामोडी या घडताना बघायला मिळतील. ज्या पद्धतीने आम्हाला पक्षातून घालवण्यासाठी रात्रंदिवस लोकांचे प्रयत्न चालू होते. याच लोकांपैकी काही लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जुळून घेण्यासाठी प्रयत्न झालेले दिसतील", असेही संकेत अनिल पाटील यांनी दिले होते.

"संधी मिळत असेल, तर ते काँग्रेसमध्ये जावू शकतात"

"काही नेते हे 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी चर्चा करत आहेत. मात्र आता काही नेत्यांना काँग्रेसमध्ये स्थान मिळत असेल, संधी मिळत असेल, तर ते काँग्रेसमध्ये जावू शकतात, भाजपमध्ये जाऊ शकतात आणि उरलेले काही नेते हे चार तारखेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आलेले पाहायला मिळतील. पक्ष सोडून बाहेर पडणारे नेते हे जालना जिल्ह्यातील असतील. काही सातारा, सांगली येथील असतील. नागपूरमधल्या काही नेत्यांची नावे मी मागच्या काळात ऐकली आहेत", असेही अनिल पाटील यांनी म्हटले.  

"तसेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता आहे तिथे त्या ठिकाणी राहण्याची नाही. या नेत्यांचे नेतृत्व मागे ठेवून नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांचे विचार बदललेले आहेत, मात्र विचारांचे कन्वर्जन हे येणाऱ्या चार तारखेनंतर आपल्याला बघायला मिळेल", असे अनिल पाटील यांनी सांगितले.