सांगली : उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दारात पाणी भरायला गेलात, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीप सोपल यांच्यावर केली आहे. दिलीप सोपल यांच्या शिवसेनाप्रवेशावर जयंत पाटील यांनी माळशिरस येथील जाहीर सभेत समाचार घेतला.
विधानसभेमध्ये जितक्या वेळेस दिलीप सोपल बोलले तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी शिवसेनेवर टीकाच केली आहे आणि आज ते शिवसेना पक्षप्रमुखांच्या दारी शिवबंधन बांधायला गेले - @Jayant_R_Patil #माळशिरस #शिवस्वराज्ययात्रा
— NCP (@NCPspeaks) August 28, 2019
विधानसभेमध्ये सोपल यांनी कायम शिवसेनेवरच टीका केली आणि आज ते त्यांच्या दारीच बंधन बांधायला गेले असंही पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षावर आत्मविश्वास असता तर महाजनादेश यात्रा काढावी लागली नसती, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
उभी हयात एका बाजूला घालवली आणि तिन्हीसांजेला @OfficeofUT यांच्या दारात पाणी भरायला गेलात, वाह रे विश्वासू सहकारी... लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर? अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil यांनी दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाचा समाचार #माळशिरस येथील जाहीर सभेत घेतला.
— NCP (@NCPspeaks) August 28, 2019
सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चित्ते पिंपळ या गावी जाऊन दिलीप सोपल यांनी राजीनामा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. त्यानंतर राजीनामा देऊन थेट संध्याकाळच्या विमानाने मुंबई गाठली. काल त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.