NCP Worker shot dead in Sangli: सांगली (Sangali) शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची (Ncp Worker) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नालसाब मुल्ला (Sangali Nalsab Mulla) असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे. (Sangali Nalsab Mulla Murder News)
बुलेट गाडीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या आहेत. तसंच, धारदार शस्त्राने वारदेखील केले. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. रात्री साडे आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. नालसाब मुल्ला यांचा बाबा नावाने ग्रुप आहे. ज्याच्या माध्यमातून नालसाब मुल्ला यांची कारकीर्द सुरू झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. बांधकाम मटेरिअल विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.
शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघां हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले ज्यामध्ये मुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुल्ला यांच्या घराबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर ही हत्या का करण्यात आली, व या मागे कोण सूत्रधार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.